खरं तर मला इन्स्पीरेशनल किंवा मोटीवेशनल पुस्तकं बोअर होतात. का कोणास ठाऊक, पण मला ते तात्पुरतं टाॅनिक वाटतं ज्याचा परिणाम लगेचच आेसरतो. अनुभव वगैरे काही मिळत नाही. त्यामुळेच मी सटल आर्ट….. हे पुस्तक एेकण्यास काडीमात्र उत्सुक नव्हतो. पण त्याबद्दल फारच एेकल्यावर प्रत्यक्ष ते पुस्तक एेकावसं वाटलं. आणि पहिल्या 10 मिनिटांतच या पुस्तकाने वेड लावलं.
हे अजिबात आयुष्यात यशस्वी असे व्हा, तसे व्हा असलं काही सांगत नाही. एखाद्याने आरसा दाखवावा आणि त्यात अंतर्बाह्य आपणच आपल्याला खरेखुरं दिसावं असं काहीसं होतं. आणि नकळत आपल्या बालपणापासून ते अत्तापर्यंत काहीही गरज नसताना आपल्याच आयुष्यात केलेली गुंतागूंत दिसायला लागते. म्हणजे मार्क मॅन्सन (लेखक) उपदेशाचे चार शब्द न सांगता थेट आरसाच दाखवतो. त्यामुळे कधीकधी मुस्काडीत खालल्यासारखं पण वाटतं. मार्क स्वतःच्या आणि त्याच्या आयुष्यातील अनेकांच्या इंटरेस्टींग गोष्टी सांगतो, त्याला आलेलं अनुभव सांगतो. सगळ्या टिपीकल संकल्पनाच तो मोडून काढतो. कसल्याही थेअरी किंवा कोटचा भडीमार न करता थेट वास्तवात जरा जास्तच वास्तवात आणतो. सतत सकारात्मक विचार करण्याचं प्रेशर आपल्याला असतं, पण वास्तव स्विकारणं हा देखील सकारात्मक विचार असू शकतो हा वेगळाच विचार त्याने मांडला आहे. सर्वसाधारणपणे सेल्फ हेल्प पुस्तकं हे आयुष्यात काय काय मिळवलं पाहिजे यावर जास्त केंद्रीत असतात, पण यामध्ये शाश्वत सुखाचा विचार केला आहे जो कसल्याही भौतिक सुखाशी किंवा काहीतरी मिळवण्याशी संबंधित नाही. त्यामुळे यातून केवळ तात्पुरता मोटीवेशनल डोस मिळत नाही तर आंतर्मुख करायला लावणारा अनुभव नक्कीच मिळतो.